• विकास

  • संस्कृती

  • संगीत

शिशू रंजन व हस्तकला संगम

मुलं म्हणजे उमलणारी फुलं ! या फुलांना उमलण्यासाठी त्यांच्यातील कलागुण ओळखून ते विकसित करण्यासाठी तसेच बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, बालपणीच त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे या हेतूने १५ ऑगस्ट २००२ रोजी शिशू रंजन व हस्तकला संगम विभाग शिशू वाटिकेत सुरु करण्यात आला.

शिशू रंजनची वेळ दुपारी ४ ते ६ असून वयोगट ३ ते ७ असा आहे. फी प्रत्येकी रु.३००/- प्रती महिना असून विभाग प्रमुख, दोन शिक्षिका व एक सेविका आहे. आजच्या पिढीची मुले हि अत्यंत चंचल व चौकस असून पालक वर्गही जागरूक झालेला आहे. पालकांमध्ये बालकांच्या शारिरीक, मानसिक, बौद्धिक गरजा लक्षात आलेल्या आहेत.
शारिरीक व मानसिक
शारिरीक व मानसिक विकासाकरिता खेळ व व्यायाम प्रकार अतिशय महत्वपूर्ण असतात. हिरव्यागार लॉनवर मोकळ्या, प्रसन्न वातावरणात विविध खेळ, व्यायाम प्रकार अशा स्पर्धा घेतल्या जातात. खेळता खेळता त्यांच्यात शिस्त, एकीची भावना व आत्मविश्वास वाढतो.
भारतीय परंपरा
मुलांना भारतीय परंपरा व संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून सर्व सण-उत्सव साजरे केले जातात. देशाबद्दल राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी म्हणून १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गांधी जयंती, लोकमान्य टिळक जयंती, कारगिल दिन, डॉ. मुंजे जयंती व शिवजयंती साजरी केली जाते.
निसर्ग संवर्धन
निसर्ग संवर्धनासाठी वृक्षरोपण करून ग्रीन- डे साजरा केला. वृक्ष लावा- वृक्ष जगवा हा संदेश देवून तुळशीची रोपे वाटण्यात आली. मुलांचे वाढदिवस वैदिक पद्धतीने होम व औक्षण करून साजरा केला जातो.
परिसर परिचय
परिसर परिचय व्हावा, निसर्गाचा आनंद लुटता यावा यासाठी सहल व क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते.वर्षाच्या शेवटी विविध गुण दर्शन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होतात.